Monday, July 10, 2006

ग्रेस..


घर थकलेले सन्यासी…..

घर थकलेले सन्यासी, हळू हळू भिंतही खचते
आईच्या डोळयामधले नक्षत्र मला आठवते

ती नव्हती संध्या मधुरा, रखरखते ऊनच होते
ढग ओढून संध्येवाणी, आभाळ घसरले होते

पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी
एकेक ओंजळी मागे, असतेच झर्‍याचे पाणी

मी भीऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई
ये हलके हलके मागे, त्या दरीतली वनराई


ती गेली तेव्हा…..

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता



वार्‍याने हलते रान…..

वार्‍याने हलते रान, तुझे सुनसान हृदय गहिवरले
गाईचे डोळे करुण उभे की, सांज निळाईतले

डोळयात शीण, हातात वीण, देहात फुलांच्या वेगी
अंधार चुकावा म्हणून, निघे बैरागी

वाळूत पाय, सजतेस काय, लाटांध समुद्रकाठी
चरणात हरवला गंध, तुझ्या की ओठी

शून्यात गरगरे झाड, तशी ओढाळ, दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद, तुझा की वैरी

1 Comments:

Blogger Rricha Nimish said...

Gres has always been my Fav...'Ti Geli' ha ek masterpiece ahe...barech divasani i felt the way i used to feel....seems like my mechanical life still has some senses left :)

10:33 PM  

Post a Comment

<< Home